श्री स्वामी समर्थ आणि अवतार 
 
              
          श्री स्वामी समर्थांना आठवले कि सर्वप्रथम त्यांची एक प्रतिमा आपल्यासमोर पद्मासन सदृश स्थितीत बसलेले पण ध्यानात नाही, विशाल कपाळ , चेहऱ्याचा भाव कठोर, उघडबंब,कोपिनधारी , गळ्यात रुद्राक्ष, उजव्या हातात गोटी असलेले, त्यांना पाहणाऱ्याकडेच त्यांचा रोख असावा अशी भेदक नजर ,अत्यंत कर्मठ वाटणारे " श्री स्वामी समर्थ ". दुसरी ओळख म्हणजे ते दत्तावतार आहेत म्हणजेच ते श्री दत्तगुरूंचे दत्तात्रयांचे तिसरे अवतार. पहिले श्रीपाद वल्लभ , दुसरे नृसिंहसरस्वती व तिसरे श्री स्वामी समर्थ अशी दत्त संप्रदाय किंवा दत्तगुरूंची भक्ती करणाऱ्या भक्तांची धारणा आहे आणि श्रद्धाही आहे, हे कळताच मग कुतूहल अजून वाढले. मग "अवतार म्हणजे नेमकं काय ?' इथून सुरुवात करणं गरजेचं आहे . अवतार म्हणजे अगदीच सोप्या भाषेत उदाहरण द्यायचं किंवा सांगायचं झालं तर दही हा दुधाचा अवतार त्याचप्रमाणे ताक, लोणी, तूप हेही दुधाचेच अवतार. दुधाचा आत्मा मूळ आहे तर शरीर वेगळ्या रूपात जन्म घेते . जसे दही , ताक , लोणी , तूप इत्यादी . हे उदाहरण अगदीच ढोबळ आहे परंतु समजून घेण्यास अगदी सोपं.
एक मूळरूप एक आयुष्य जगतं . त्याच्या निर्वाणानंतर त्या रूपाचा आत्मा पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या शरीर रूपात जन्म घेतो .तो त्यामुळे त्या मूळरूपाचा अवतार होईल निश्चितच तसे घडण्यामागे एक प्रयोजन असते.

"यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत,अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम।
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ।।"


        श्रीकृष्णाने गीतेत उद्धृत केलेल्या या ओळी अवतार या संकल्पनेसाठी प्रमाण मानल्या जातात किंवा त्यांचा आधार घेतला जातो. देवाने ही सृष्टी निर्माण केली त्यात वेगवेगळे जीव निर्माण केले.त्या जीवानुसार त्यांची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये , शरीरारचना , गुणधर्म विकसित केले. परिवर्तन हा नियम केला. त्यानुसार वेळोवेळी सृष्टीवर होणारे बदल व सर्व प्राण्यांच्या जीवनसृष्टी चक्रावर होणारे परिणाम लक्षात घेता चांगल्यातून वाईट , वाईटामधून अतिवाईट आणि अतिवाईटाचा प्रवास हा पुन्हा चांगल्या गोष्टीच्या जन्मात होतो , हा सृष्टी नियम केला. या सृष्टी नियमाला तसेच सृष्टीचक्राचे संतुलन नीट व नियमित राखण्यासाठी देव या सृष्टीवर मनुष्य रूपात किंवा इतर प्राणी रूपात पुनर्जन्म घेतो . धर्माचा ऱ्हास होऊ लागला की ईश्वर पुन्हा धर्म संस्थापनेसाठी अवतार घेऊन ही सृष्टी संतुलित करतो .
ही अवतार संकल्पना प्रामुख्याने हिंदू धर्मातील पुराणांमध्ये आढळते. मग विष्णू , शिव यांचे अवतार तर शिवाची पत्नी पार्वती हिला 'आदिमाया आदिशक्ती ' म्हणून म्हटले जाते तिचे शक्तीपीठ स्वरूप इतर अवतार. श्री गणेशाचे इतर अवतार असेच इतर देवांचे इतर अवतार मानले गेले आहेत . तसा त्यांचा उल्लेख वेगवेगळ्या पुराणकथांमध्ये केला गेलेला आहे. दुर्जनांचा नाश करायला , समाजात वाढत जाणारा दुष्कृत्यांना आळा घालायला , लयाला जाणाऱ्या समाजाची अधोगती थांबवण्यासाठी , ऱ्हास होत चाललेल्या धर्मरक्षणासाठी हे अवतार जन्म घेतात. ते अवतार आपले कार्य करतात आणि इप्सित साध्य झाले की ते अवतार समाप्ती करतात . साधारण असे अवतार कार्य असते .


श्री दत्तगुरूंचे अवतार  "श्री स्वामी समर्थ "

       श्री स्वामी समर्थांचे चरित्र व कार्य लक्षात घेता ते नक्कीच अवतार स्वरूप असल्याचे जाणवतं कारण अशा व्यक्तींमध्ये दैवी अंश असल्याने ते साधारण मनुष्याच्या पलीकडे असतात आणि जगतात . काही असाधारण गोष्टी , अति मानवीशक्ति त्यांच्या अंगी असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तसेच सानिध्यात एक प्रकारचा विलक्षण , असामान्य दैवी भास सतत होत असतो. स्वामी समर्थांच्या लीला व चमत्काराचा अभ्यास केला तर अवताराचे सर्व गुणधर्म स्वामींमध्ये होते हे स्पष्ट जाणवते. पण हा अवतार नेमका कुणाचा हा प्रश्न मनाला भेडसावत होता. सर्वसाधारणपणे श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तगुरूंचे तिसरे की चौथे अवतार होते अशी एक सर्वसामान्य लोकांची भावना आहे. तिसरे की चौथे असं का म्हणतो? कारण महाराष्ट्रात श्रीपादवल्लभ,नृसिंह सरस्वती यांच्यानंतर ' दत्तावतार' म्हणून स्वामींना स्थान दिले गेले. तर कर्नाटकातील बिदर येथील माणिक नगर येथील जनता तसेच श्री माणिकप्रभूंचे सर्व लाखो भक्तगण श्री माणिक प्रभू महाराजांना तिसरे दत्तावतार मानतात . हे कळल्यावर मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहेच त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे खरंच कुणाचे अवतार होते की ते स्वयंभू होते? याचा विचार नक्कीच करावासा वाटतो कारण कोणी कुणाचातरी अवतार म्हटल्यावर एका अवतारापासून पुढील अवतारापर्यंत काहीतरी सुसंगती असणं गरजेचं आहे.




 
'श्रीपादवल्लभ '

      मद्रास प्रांतातील पिठापूर या गावी आपस्तंभशाखेतील आपळराज व सुमता या ब्राह्मण दाम्पत्यांच्या घरी अमावस्येच्या दिवशी श्राद्धाचे आयोजन होते तेव्हा दुपार वेळी श्री दत्त अतिथीरुपात त्यांच्या घरी गेले. त्यावेळी श्राद्ध करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते, ते झाल्याशिवाय कोणी अतिथीला भोजन देणे हे शास्त्र नियमांच्या विरुद्ध होते . तरीही श्री दत्तांसारख्या तेजस्वी अतिथीला भोजनाशिवाय पाठवणे अपळराजची पत्नी सुमतेला योग्य वाटले नाही . शास्त्र नियमांच्या विरुद्ध जाऊन तिने अतिथीला भिक्षा दिलीच तो अतिथी भव पाहून श्री दत्तात्रेय यांनी तिला म्हटले की माते तुझ्या भिक्षेने मी संतुष्ट झालोय तुला काय हवे असेल ते माग. " त्यावर सुमता म्हणाली, "मला आपण माता म्हणालात तेव्हा तेच खरे करून दाखवा." त्यावर श्री दत्तप्रभू " तथास्तु"असा आशीर्वाद देऊन गुप्त झाले आणि त्या सुमतेच्या पोटी काही काळाने एक तेजस तेजस्वी पुत्र जन्मला.तोच 'श्रीपादवल्लभ ' श्री दत्त प्रभूंचा पहिला अवतार वयाच्या सोळाव्या वर्षी लग्नास नकार देऊन वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत असे जाहीर करून साधू जनांना दीक्षा देण्यासाठी आणि जनउद्धारासाठी श्रीपादवल्लभ घर सोडून बाहेर पडले. आपल्या आई-वडिलांच्या रक्षणार्थ आंधळ्या पांगळ्या व मूढ बंधूंना श्रीपादवल्लभांनी आपल्या अमृत दृष्टीने अव्यंग केले व आई-वडील बंधूंचा निरोप घेऊन अदृश्य झाले. पुढे काशी क्षेत्र, बद्रिकाश्रम , गोकर्ण करीत तिथे तीन वर्षे राहून ते कुरवपूरास प्रकट झाले तिथे अंबिका नावाची विध्वस्त्री होती. गुरुचरित्रामध्ये लिहिल्या गेलेल्या माहितीनुसार अंबिका नावाच्या विधवा स्त्रीला एकुलता एक मुलगा होता . जो अत्यंत मूढ होता . आयुष्याला कंटाळून अंबिका गंगेमध्ये आत्महत्या करण्यास गेली. त्याचवेळी श्री गुरु तिथे गंगा स्नान करावयास आले होते. त्यांचे अलौकिक, दिव्य, तेजोमय रूप पाहून मरणाआधी त्या तेजस्वी पुरुषाचे दर्शन घ्यावे व मग गंगेत जीवन संपवावे असे तिने ठरवले . तसे ठरवून अंबिका आपल्या मुलांसहित श्रीगुरूंकडे गेली व तिथे आशीर्वाद म्हणून साक्षात आपल्यासारखा ज्ञानी आणि दिव्य पुत्र माझ्याही पोटी जन्मास यावा अशी मागणी केली . दत्तात्रेयांनी तिला तसा आशीर्वादही दिला .


श्री नृसिंहसरस्वती

      महाराष्ट्र मधील वऱ्हाड प्रांतातील ‘कारंजा’ या गावी अंबाभवानी व माधव या माता-पिताच्या पदरी नरहरीचा जन्म झाला. जन्मानंतर तो रडण्या ऐवजी प्रणवोच्चारच करू लागला . त्यामुळे तो मुका तर निपजणार नाही ना ,अशी भीती अंबाभवानी व माधव यांस वाटू लागली. परंतु मौजी बंधन झाल्यावर मुका वाटणारा ' नरहरी ' आपल्या गंभीरवाणीने वेदघोष करू लागला. ते ऐकून त्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु आईने मुंजीच्या वेळी भिक्षा मागण्याचा उपदेश केला होता त्यास आज्ञा प्रमाण मानून नरहरीने आईचा निरोप घेतला व तिच्या मस्तकावर हात ठेवून आईला पूर्वजन्मीच्या वृत्तांताचे पूर्वस्मरण करून दिले पूर्वजन्मी अंबिका भवानी अंबा भवानीने म्हणजेच अंबिकेने श्रीपादवल्लभांना तुमच्यासारखा पुत्र होऊ दे असा वर मागितला होता व त्याची पूर्तता झाली होती. तोच नरहरी म्हणजे ' "नृसिंहसरस्वती" 'त्यांनाच दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाते.

       श्री नृसिंहसरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दळीवनात गेले ते पुन्हा परतलेच नाहीत. कर्दळीवनात त्यांनी समाधी घेतल्याचे बोलले जाते. ती समाधी प्रदीर्घ काळ म्हणजेच साधारण 300 वर्ष चालू होती त्यादरम्यान त्यांच्या भोवती मुंग्यांचे प्रचंड वारूळ निर्माण झाले एक लाकूडतोड्या आपली कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडण्यासाठी त्या वारुळाच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी तोडत असता ती कुऱ्हाड निसटली व तिचा घाव वारूळावर पडला त्या क्षणी घाव पडलेल्या भागामधून रक्त येऊ लागले. वारुळाला भेगा पडल्या. वारुळामध्ये प्रचंड हालचाल होऊ लागली व त्या वारुळामधून तेच समाधीस्थ नृसिंहसरस्वती "श्री स्वामी समर्थ " म्हणून बाहेर आले आणि हे रूप म्हणजेच श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जाते . जेव्हा आपण कुणा एकाचा हा अवतार आहे असं मानतो किंवा म्हणतो, तेव्हा त्या कुणा एकामध्ये आणि त्याच्या इतर अवतारांमध्ये काही सुसंगती असणं गरजेचं आहे . मुळात श्री दत्तगुरु व त्यांचे दोन अवतार श्रीपादवल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या बद्दल म्हणायचे झाले तर काही प्रमाणात सुसंगती सापडू शकते पण श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार म्हटले तर विसंगतीच सापडते त्यामुळे मनात बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात. याचे मुख्य कारण शोधायचं झालं तर प्रथम ज्या कर्दळी वनातील गोष्टीला प्रमाण मानून स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. तीच गोष्ट कल्पनातीत किंवा तयार केल्यासारखी वाटते. नृसिंह सरस्वती महाराज शेवटचे कर्दळीवनात जाऊन समाधी घेतल्याचे बोलले जाते किंवा ते कर्दळीवनात गेल्यानंतर कधी कुणालाच पुन्हा दिसले नाहीत. हा नृसिंहसरस्वती चरित्राचा शेवटचा बिंदू मानला तर मग पुढे त्यांना थेट स्वामी समर्थांची जोडले गेले आहे की वारूळातून बाहेर पडलेले श्री स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वती आहेत, जे कर्दळीवनात जाऊन 300 ते 350 वर्ष समाधी अवस्थेत होते , तशीच गोष्ट सांगितली जाते आणि इथेच तर्काला वाव मिळतो . 


  • श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंहसरस्वती आहेत का ? 
एक नृसिंह सरस्वती यांची शरीरयष्टी ही एका सामान्य माणसासारखी होती पण स्वामी समर्थ यांची देहयष्टी सात फुटा पेक्षा उंच , स्वामींचे विशाल कपाळ,पोट- हात- पाय- कान- नाक या सर्वांची शरीररचना नृसिंह सरस्वती पेक्षा अगदी वेगळीच होती. जर कुणी संन्यासी साधू पुरुष समाधी व्यवस्थेत तीनशे वर्षे असेल तर त्याचे शरीर हे फक्त हवेवर तग धरून असते. अन्न, पाणी घेण्याचा प्रश्नच नसतो त्यामुळे त्यासमाधीवस्थेत शरीर हे हळूहळू आकुंचन पावते. हिमालयातील कित्येक साधू पुरुषांच्या तस्वीरी पाहिल्यावर ते लक्षात येते शिवाय वैज्ञानिक दृष्ट्या हेच सत्य आहे. समाधीवस्थेत जर नृसिंह सरस्वती 300 वर्ष असतील तर त्यांचे शरीर विस्तार करू शकत नाही . साडेपाच सहा फूट उंचीची व्यक्ती सात फुटापेक्षा अधिक उंचीची कशी वाढेल? शिवाय शरीरावर वारूळ निर्माण झाले याचा अर्थ ती व्यक्ती जागेवरूनच उठली नसावी . मग तर शरीराचा विस्तार तर संभवच वाटत नाही या प्रश्नावर योगाच्या अनुषंगाने जरी उत्तर शोधायचं झालं तरी ते शरीर विस्तार समाधीवस्थेत शक्य दिसत नाही.

  • वारूळ ,लाकूडतोड्या आणि स्वामींचे प्रकटीकरण ही गोष्ट सत्य वाटते का? 

आज या इंटरनेटच्या युगात माहिती मिळवणे शोधणे कठीण नाहीये त्यानुसार ज्या कर्दळीवनाची गोष्ट सांगितली जाते , तिच्याही सत्यतेचा विचार करणं गरजेचं आहे. आज जिथे कर्दळीवन दाखवले जाते ते कर्दळीवन भारताच्या दक्षिण प्रांतात आहे. ते ठिकाण किंवा भाग जंगलमय आहे आजही नागरिक व मानवी वस्ती जवळपास दिसत नाही. आजच्या युगातही तिथे पोहोचण्यासाठी खर्च , प्रवास करावा लागतो. अशा ठिकाणी साधू,पुरुष ,संन्याशी, वैरागी ध्यानधारणेसाठी किंवा समाधीस्थ होण्यासाठी जाऊ शकतो हे जरी मान्य केले तरी एक साधा लाकूडतोड्या लाकूड तोडायला मुळातच अशा घनघाट वनात का जाईल ? सर्वसाधारणपणे लोकवस्ती जिथे असते तिथून जवळपास अंतरावरच माणसे लाकडे तोडायला किंवा जमा करायला जाऊ शकतात . पण ते सोडून कर्दळीवनात एखादा लाकूडतोड्या लाकूड तोडायला जातो. त्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकतात. जरी आपण तो लाकूडतोड्या कर्दळीवनात जाऊन लाकूड तोडायला जरी गेला असे गृहीत जरी धरले तरी तो एका भल्या मोठ्या वारुळाच्या बाजूचे झाड तोडायला का जाईल? मुळात तो वारुळापासून सावध राहून तो अन्य ठिकाणी लाकूडतोड करील, त्यामुळे वारुळा जवळ लाकूडतोड्याच्या लाकूडतोड करण्यावरही प्रश्न निर्माण होतो. शिवाय लाकूड तोडत असताना लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारूळावर पडते आणि वारूळावर जिथे कुऱ्हाडीचा घाव पडला त्यातून रक्त बाहेर येणे हे सगळं कल्पनातीत वाटते त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण गोष्टींमध्ये सत्याचा आणि तर्काचा काही संबंध वाटत नाही.
       स्वामींच्या एका घटनेमध्ये ते स्वतः बोलण्याचा उल्लेख आढळतो की " आम्ही कर्दळीवनातून निघालो ...." आणि मग अक्कलकोट पर्यंतचा प्रवास वृत्तांत त्यांनी सांगितला. तोच आधार धरून स्वामींची कर्दळीवनाची गोष्ट रचल्याचे जाणवते आणि नृसिंह सरस्वती ही कर्दळीवनात गेल्याने जबरदस्ती नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थांचा अवतार संबंध जोडल्याचे दिसते. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ दोघेही कर्दळीवनात गेले असतील याबद्दल शंका नाही पण नृसिंहसरस्वतींचे स्वामी समर्थ बनून बाहेर आले असे कसे म्हणावे ? आणि स्वामी जर स्वतः खरेच नृसिंह सरस्वती होते तर त्यांनी स्वतःची ओळख का लपवली असावी ? याचे उत्तर कोणाकडूनही मिळत नाही.
एकदा गाणगापूरचे काही पुजारी स्वामींना भेटायला आले.स्वामींनी त्यांना त्यांच्या देवाचे नाव विचारले असता , त्यांनी "आमच्या देवाचे नाव नृसिंहसरस्वती आहे  ." असे उत्तर दिले होते. त्यावर स्वामी म्हणाले "आमचे नाव नृसिंहभान "  नृसिंहसरस्वती हेच स्वामी होते तर स्वामी 'मीच नृसिंहसरस्वती' म्हणून बोलले नसते का?  किंवा का बोलले नाहीत ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. नृसिंहभान म्हणजेच नृसिंह सरस्वती कसे म्हणायचे ? नेमकं सत्य काय होतं ? याबद्दल कोणताच पुरावा उपलब्ध नाही. ज्या गोष्टी आपण ऐकतो वाचतो त्या कुणीतरी लिहिलेले आहेत .त्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार नाहीत.  श्री स्वामी समर्थ यांचे निर्वाण होऊन आज १४० हुन अधिक वर्षांचा काळ लोटला असून आजही स्वामींच्या गोष्टींचा कोणताही तपास न करता , सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता , तशाच पुढे नेल्या आहेत. त्यातही श्री संजय वेंगुर्लेकर, नम्रता भट , विवेक वैद्य यांच्यासारखी काही मंडळी एक संशोधक म्हणून गेली कित्येक वर्ष प्रयत्न करून श्री स्वामी समर्थांविषयीचे महत्त्वाचे संशोधन लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या संशोधनामुळे बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा हळूहळू होत आहे, अनेक प्रश्नांची उकल होत आहे. या प्रयत्नास स्वामी महाराज बळ देवो ही स्वामी चरणी प्रार्थना ! 
        एखाद्या चरित्राची सत्यता पडताळली गेली की त्या चरित्राच्या अस्तित्वाची मूल्ये जपली जातात. स्वामींना कुणाचा तरी अवतार म्हणून आपण त्यांचे चरित्राचे ऐतिहासिक मूल्य कमी करत आहोत असं वाटतं. फक्त चमत्कार आणि लीला यामध्येच श्री स्वामी समर्थांचे चरित्र गेली १४० वर्ष आपण बंदिस्त करून ठेवले . त्यामुळे स्वामी समर्थ हे एक इतिहास असून सुद्धा त्यांना आजच्या इतिहासामध्ये स्थान नाहीये हे दुर्दैव ! संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम ,एकनाथ अशा महान संतांप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा स्वामींनी केलेले कार्य मोठे जाणवते. स्वामींचे चमत्कार, लीला यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या चरित्राचा व कार्याचा विचार होणे महत्त्वाचे आहे . अन्यथा आज मशीन युगाकडून डिजिटल युगाकडे वाटचाल करत असताना डिजिटल युगात पोहोचलेल्या आणि पुढे तंत्रज्ञान विकसित होणाऱ्या जगात पुढच्या पिढ्या हे या चमत्कार ,लीलांचा किती गंभीरपणे त्याचा विचार करतील माहित नाही . 
जेवढे आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐतिहासिक म्हणून पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ , तेवढे ते एका पिढीकडून दुसऱ्या पुढच्या पिढीकडे जाणार आहे. जर स्वामींच्याच बोलण्याचा आधार घेऊन ते कुणाचे अवतार होते हे ठरवायचे झाल्यास स्वामी एकदा " मीच राम होतो, कृष्ण होतो " असं देखील बोलले आहेत. आता राम कृष्ण यांना आपल्या पुराणशास्त्रात विष्णूंचे अवतार मानले जात मानले गेले मग “मीच राम होतो कृष्ण होतो” या वाक्य उच्चारानुसार स्वामींना आपण विष्णूचा अवतार मानायला हवं. जर कुणाला स्वामी दत्तात्रयांचे रूपात दिसत दिसले किंवा दर्शन दिले असेल आणि म्हणून जर आपण स्वामींना दत्तात्रेयांचे अवतार मानत असू तर मग स्वामींनी वेगवेगळ्या भक्तांना, साधकांना विठ्ठल, शिवशंकर, राम, विष्णू ,अन्नपूर्णा अशा इतर देवतांच्या रूपातही दर्शन दिले. मग फक्त स्वामी समर्थ दत्तात्रेयांचे अवतार कसे ? हा प्रश्न मनात उरतोच. स्वामी समर्थांच्या सहवासात कुणी आला तर स्वामी त्यास त्याच्या आराध्य देवतेच्या रूपात दर्शन द्यायचे किंवा दृष्टांत द्यायचे हे स्वामी समर्थांच्या चरित्राचे एक वैशिष्ट्य होतं . आज स्वामींना आपण अवतार बंधनातून मुक्त करून त्यांच्या चरित्राचा अभ्यास आणि विचार करण्याची वेळ आली आहे . जर आपण स्वामी समर्थच नव्हे तर इतर महान विभूतींनाही अवतार मुक्त केले आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं तर प्रत्येक चरित्रांमधून आपण नवं काहीतरी शोधू शकतो आणि मिळवू शकतो.आपण या दृष्टीकोनातून  श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचा  विचार करूया .

                                                     ।। श्री स्वामी समर्थ।।

टिप्पण्या